मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा)दि.०३/०३/२०२६
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विद्यमान व माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा ग्राम संवाद सरपंच असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीसंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मा. कार्यसम्राट आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी जिल्हा ग्राम संवाद सरपंच असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अतुल पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून बाहेरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र स्थानिक पातळीवरील प्रश्न, गावाची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती, विकासकामांची माहिती आणि ग्रामस्थांशी असलेला थेट संपर्क लक्षात घेता विद्यमान किंवा माजी सरपंचच प्रशासक म्हणून अधिक सक्षमपणे काम करू शकतात. त्यामुळे शासनाने सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबत तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा उपाध्यक्ष श्री. राहुल पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. रणजितसिंह राजपूत यांनीही या मागणीचे समर्थन करताना सांगितले की, सरपंच हे गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू असतात. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा उपयोग ग्रामविकासासाठी होणे आवश्यक आहे. प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती झाल्यास विकासकामांना गती मिळेल व प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण होतील असे मत व्यक्त केले या निवेदनाची दखल घेत आमदार व श्री. किशोर आप्पा पाटील यांनी सरपंचांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर लवकरच पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच श्री. शिवदास पाटील (सारोळा), श्री. संतोष परदेशी (डांभुर्णी), श्री. सुदाम वाघ (खडकदेवळा), श्री. ज्ञानेश्वर तांबे (शिंदाड), श्री. गोकुळ पाटील (खाजोळा), श्री शिवाजी परदेशी (सावखेडा), श्री. नितीन भोसले (शेवाळे), श्री. भगवान पाटील (वडगाव टेक), श्री. प्रकाश पाटील (डोंगरगाव), श्री. समाधान वाघ (सावखेडा) यांच्यासह विविध गावांतील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच असोसिएशनच्या या मागणीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




