मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा )दि.१२/०३/२०३६
पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ‘रणरागिणी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व पत्रकार संघ, गजानन लाधे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मार्च २०२६ रोजी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, सेवेकरी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस असून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश पसरावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम होत्या. तर सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे १८ महिलांना ‘रणरागिणी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित महिलांच्या कार्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी महिलांना संदेश देताना सांगितले की, महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला घाबरून न जाता त्याविरोधात धैर्याने लढा दिला पाहिजे. महिलांमध्ये अपार शक्ती आहे आणि त्या समाज परिवर्तन घडवू शकतात.
तर प्रमुख पाहुण्या श्वेता सीमा विनोद पाटील यांनी आपल्या मनोगतात स्त्री-पुरुष समानता ही समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मुलींनी शिक्षण घेऊन स्वबळावर उभे राहावे व समाजात आपले स्थान निर्माण करावे, असा संदेश त्यांनी दिला.
या वेळी संदीप पाटील यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून महिलांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती दिली. तसेच ह.भ.प. महिला महाराज यांनी महिलांनी जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी व संस्कृती जपावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डोंगरगावचे माजी सरपंच गजानन भाऊ कळवत्रे, मुकेश मापारे तसेच गावातील सेवेकरी, माता-भगिनी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी केले.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.




