मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा)दि.१४/०३/२०२६
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाला अखेर धक्कादायक वळण मिळाले आहे. प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर तरुणाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून या प्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथील रहिवासी संजय भिमा राठोड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेपर्यंत तो परतला नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र तो कुठेही मिळून आला नाही. यावरून २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात १५/२०२६ क्रमांकाने बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी हाती घेतला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता संजय परशुराम जाधव याच्यावर संशय बळावला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असता सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत उघडकीस आलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली संजय जाधव हिचे आणि बेपत्ता तरुण विजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनाली हिचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे तिला धमकावत असल्याची बाब संजय जाधव याला समजली. या कारणावरून रागाच्या भरात संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली जाधव यांनी मिळून विजय राठोड याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव या दोघांना अटक केली. आरोपींना पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम (पाचोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे, सागर पाटील आदी पोलिस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या खूनप्रकरणामुळे पाचोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




