पिंपळगाव हरेश्वर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त.

0
232

मुख्य संपादक: सतिष गोपाळ 
पाचोरा दि.१७/०२/२०२६

पिंपळगाव हरेश्वर येथील बहुळा नदीच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १,५६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गावातील बहुळा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तत्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
या पथकात पोहेकॉ 1030 अरुण राजपूत, पो.कॉ 2849 भारत पाटील, पो.कॉ 152 योगेश भिलखेडे यांचा समावेश होता. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकला असता सहा इसम जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १,५६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक मा. कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मा. बापू रोहम (पाचोरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईमुळे परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कडक नजर असल्याचा संदेश गेला असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.