मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा) दि.२७/०७/२०२७
पाचोरा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची दमदार छाप उमटवली आहे. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करत पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अनेक वाहनधारकांना दिलासा मिळाला असून पाचोरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाचोरा पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना मिळाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अतिशय नियोजनबद्ध आणि गोपनीय पद्धतीने तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदीचे खेडगाव परिसरात सापळा रचण्यात आला आणि अमोल राजेंद्र ढमाळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मास्टर कीच्या सहाय्याने बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण कारवाईत पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत सतर्कता, संयम आणि तांत्रिक तपास कौशल्य दाखवले. विशेष म्हणजे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड यांनी तपासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. अशा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांमुळेच नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
याचबरोबर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सपोनि प्रदीप शेवाळे, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेकॉ विलास पाटील, पोहेकॉ श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ उमेश पाटील, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ संदीप पाटील आणि पोकॉ हरीश परदेशी या संपूर्ण पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत ही उल्लेखनीय कामगिरी केली.
पाचोरा पोलीस ठाणे केवळ गुन्हे उघडकीस आणत नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने जागरूक राहून प्रभावी कारवाई करत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.




