मुख्य संपादक: सतिष गोपाळ
पाचोरा दि.१३/०२/२०२६
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कोल्हे गावात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्युत पंप, केबल वायर, शेतीपयोगी अवजारे, शेळ्या तसेच बैलजोड्या चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. मेहनतीने उभारलेले शेतीसाठीचे साहित्य एका रात्रीत गायब होत असल्याने आर्थिक फटका बसत असून ग्रामीण भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर गावात सट्टा, मटका, जुगार तसेच अवैध गावठी दारू व देशी-विदेशी मद्यविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गैरप्रकारांमुळे चोऱ्यांचे सत्र सुरु असून तरुण पिढी बिघडत असल्याची चिंता व्यक्त करत गावातील महिलांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कायद्याची भीती उरली नसल्यासारखे वातावरण तयार झाले असून अवैध धंद्यांना कोणाचा तरी वरदहस्त आहे का, असा उघड सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ कोल्हे ग्रामस्थांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनवर धडक देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. या घटनेची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी कोल्हे गावात छोटेखानी ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थ व महिलांशी थेट संवाद साधला. ग्रामसभेत “गावातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत आणि चोऱ्यांचे सत्र थांबवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात,” अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती.
मात्र ग्रामसभा होऊन तब्बल पंधरा दिवस उलटूनही अवैध धंद्यांवर धाडसत्र किंवा ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे विशेषतः महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आश्वासनांपुरतेच प्रशासन मर्यादित राहणार का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील वाढत्या असुरक्षिततेमुळे नागरिकांमध्ये रोष वाढत असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच अनुषंगाने, येत्या आठ दिवसांत कोल्हे गावातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता पोलिस प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते आणि गावातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी कोणती ठोस कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




