मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा)दि.२८/१२/२०२५
शासन गोरगरिबांच्या, आदिवासी व वंचित घटकांच्या मुलांसाठी आश्रम वसतिगृह चालवते, कारण शिक्षण हा त्यांच्या जीवनाचा एकमेव आधार आहे. मात्र पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरे संचलित श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम वसतिगृहात जे घडते आहे, ते पाहता हा शिक्षणाचा आधार नसून अमानुष छळाचा अड्डा असल्याचा प्रश्न निर्माण होतो.

नोटीस बोर्डावर सकाळचा नाश्ता दाखवायचा आणि प्रत्यक्षात मुलांना दूध, चहा, नाश्ता काहीच द्यायचे नाही, एकच गणवेश देण्यात आला आहे. हा सरळसरळ फसवणुकीचा प्रकार नाही का? सकाळी दहा वाजता एक वेळचे जेवण आणि नंतर थेट सायंकाळी सात वाजेपर्यंत उपाशी ठेवणे, हे कोणत्या नियमात बसते? लहान मुलांना नऊ नऊ तास उपाशी ठेवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक छळ आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दिलेले अॅक्वा फिल्टर नादुरुस्त ठेवले जातात, मुलांना सिमेंटच्या टाकीतील पाणी प्यावे लागते, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. साबण नाही, तेल नाही, गादी नाही, चादर नाही – मग अनुदानाचे लाखो रुपये जातात कुठे? हा प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा ठरतो का?

खिडक्यांना जाळ्या नाहीत, शौचालये मोडकळीस आलेली आहेत, पाण्याविना आहेत. साप-विंचू येण्याचा धोका असतानाही प्रशासन गप्प का? एखादा अपघात घडल्यावरच यंत्रणा जागी होणार का?
या साऱ्या प्रकारांपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे सत्य पाहण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच धमकी देण्यात आली. “त्यांना हाकलून लावा, नाहीतर निलंबन करीन,” अशी भाषा वापरली जाते, म्हणजे ही संस्था शासनाच्या नियमांनी चालते की एखाद्या व्यक्तीच्या मर्जीने ? सत्य दडपण्याचा हा प्रयत्न असल्यास, त्याची चौकशी कोण करणार?


जर गोरगरिबांच्या मुलांसाठी आलेले अनुदान मुलांपर्यंत पोहोचत नसेल, तर ते नैतिक नव्हे तर कायदेशीर गुन्हा ठरतो. केवळ चौकशीचे आदेश देऊन हे प्रकरण मिटवता येणार नाही. दोषींवर तात्काळ निलंबन, अनुदानाची लेखापरीक्षण चौकशी, आणि मुलांना त्वरित सुविधा देण्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. हा प्रश्न केवळ एका वसतिगृहाचा नाही, तर व्यवस्थेच्या संवेदनशून्यतेचा आरसा आहे. आज जर या मुलांसाठी आवाज उठवला गेला नाही, तर उद्या हीच व्यवस्था प्रत्येक दुर्बल घटकाच्या दारात उभी राहील.

म्हणूनच प्रश्न स्पष्ट आहे. ही मुले शासनाची जबाबदारी आहेत की दुर्लक्षित ओझे?




