मुख्य संपादक: सतीश गोपाळ
(पाचोरा) दि.१०/१२/२०२५
पिंपळगाव हरेश्वरमध्ये गोवंश हत्येवर पोलिसांची धाड सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या कारवाईचे जिल्हाभरातून स्वागत होत असतांनाच गोमांस विक्रेत्यांची सखोल चौकशी केल्यास गुरे चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपळगाव हरेश्वर परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सुरू केलेली वॉश आऊट मोहीम आता प्रभावी ठरत आहे. पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गती दिल्याने अवैध धंदे करणाऱ्या काही मंडळींनी ही कारवाई निष्फळ ठरविण्याचे कारस्थान रचल्याची माहिती सुज्ञ नागरिकांकडून पोलिसांना मिळाली होती.

याचदरम्यान, मंगळवार दिनांक ९ डिसेंबर रोजी गावातील एका समाजाच्या शादिखान्याजवळ काही व्यक्तींकडून गोवंशाची अवैधरित्या हत्या करून त्याचे अवैध मांस विक्रीस उपलब्ध करून देत असल्याची खात्रीलायक माहिती स. पो. नि. कल्याणी वर्मा यांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने पथक तयार केले व सांगितलेल्या ठिकाणी अचानक धाड टाकली.
धाडीत एका घरात अवैध गोमांसाचा साठा, गोवंश वधासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यारसाहित्य, तसेच ओमनी गाडीतून सुरू असलेली मांस वाहतूक आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आणि आरोपींना रंगेहाथ पकडत अटक केली. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, हे मांस पॅक करून बाहेरील गावांत मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्याची तयारी सुरू असल्याचे उघड झाले आहे.
असे असले तरी सुज्ञ नागरिकांच्या मते याठिकाणी कापण्यात आलेले पशुधन कुठून उपलब्ध झाले, हे पशुधन विकत घेतले होते का चोरुन आणलेले होते याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याने या गोमांस विक्रेत्यांची सखोल चौकशी केल्यास गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गुरे चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता अत्यंत स्पष्ट आहे. परिसरातील शेतकरी वर्ग गुरे चोरीमुळे त्रस्त असून या धाडीनंतर त्यांच्या मनात काही प्रमाणात दिलासा निर्माण झाल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी गुरे गायब होण्याच्या घटना घडत असल्याने यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला होता.
म्हणून संबंधित संशयित आरोपींच्या ताब्यात अजूनही काही पशुधन असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे पशुधन कत्तल करण्यासाठी ठेवण्यात आले आहे का ? या पार्श्वभूमीवर पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी करुन या चौकशीच्या माध्यमातून अवैधरित्या गोवंशाची हत्या करुन मांस विक्रीची व गुरे चोरीच्या मागील जाळ्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा जनमानसातून व्यक्त केली जात आहे. तसेच या मांस विक्रीच्या अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.




