मुख्य संपादक:-सतिष गोपाळ
(पाचोरा)दि.०२/०१/२०२६
राजमाता जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्तिदिनाच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात उद्या सामाजिक व राजकीय परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. शिवसेनेच्या नेत्या तथा पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीताताई किशोर (आप्पा) पाटील यांच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण समारंभ उद्या दिनांक ३ शनिवार रोजी उत्साहात पार पडणार आहे.
हा पदग्रहण सोहळा सकाळी १० वाजता मानिंग ग्राउंड, पाचोरा येथे होणार असून, या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवणारे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर, शासनाच्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, महिलांचे हक्क व नेतृत्व विकास याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
महिलांनी केवळ घरगुती चौकटीत न अडकता सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. महिलांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्वावलंबन साधणे आणि नेतृत्वक्षमता विकसित करणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना सौ. सुनीताताई किशोर पाटील शहराच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्धार व्यक्त करणार आहेत. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि महिला-केंद्रित धोरणांना प्राधान्य देत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत नागरी प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या पदग्रहण सोहळ्यास शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करावे, असा सकारात्मक संदेशही या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
महिला मुक्तिदिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम केवळ पदग्रहणापुरता मर्यादित न राहता, पाचोरा शहरातील महिलांसाठी नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नव्या संधी निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकूणच, पाचोरा नगरपरिषदेच्या नेतृत्वात सुरू होणारे हे नवे पर्व शहराच्या विकासासाठी आशादायी ठरणार आहे.




