मुख्य संपादक: सतीश गोपाळ
(पाचोरा) दि.०८/१२/२०२५
नाशिकच्या तपोवन परिसरात आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो प्राचीन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड या धक्कादायक प्रस्तावाने संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पवित्र, ऐतिहासिक व पर्यावरणीय वारशाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोवनातील हरितसंपदा नष्ट करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध करण्यासाठी पाचोरा पत्रकार संघाने सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत आपली ठाम भूमिका मांडली.
उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना सादर केलेल्या निवेदनात पत्रकार बांधवांनी प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की “तपोवनातील शेकडो वर्षे उभे असलेले महावृक्ष हे ऋषी-मुनींच्या तपश्चर्येचे साक्षीदार आहेत. त्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवून काँक्रीटचे महाकाय प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न हा सांस्कृतिक वारशावरचा थेट आघात आहे.” तपोवन सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचा जिवंत श्वास, रामायणकाळातील आश्रम, ऋषींचे निवास, विशाल महावृक्षांनी भरलेल्या तपोवनाला ‘नाशिकचा गाभा’ मानले जाते. हा केवळ जंगलाचा भाग नसून, शतकानुशतकांचा इतिहास, अध्यात्म, नदीकाठचे पर्यावरणीय संतुलन आणि स्थानिक जैवविविधतेचा महत्त्वाचा आधार आहे असे नमूद केले आहे.
तसेच पर्यावरण अभ्यासकांच्या मते या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वृक्षांची वृक्षतोड झाल्यास नदीकिनारी मृदा धूप वाढेल, भूजल पातळी घसरेल, परिसरातील तापमानात धोकादायक वाढ होईल, सांस्कृतिक पर्यटनावर गंभीर परिणाम होईल तरीदेखील कुंभमेळ्याच्या नावाखाली सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभारण्याच्या तयारीत प्रशासन असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
पत्रकार संघाचा प्रशासनाला दमदार इशारा.
याचीच दखल घेत पाचोरा तालुका व शहरातील पत्रकार बांधवांनी एकत्र येत तीव्र भूमिकेसह प्रशासनाचे लक्ष वेधले. व दिलेल्या निवेदनात स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे की “जर तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने आम्ही पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू.” असा इशारा दिला असून प्रांताधिकारी मा. भुषण अहिरे यांनी निवेदनाची नोंद घेऊन ‘योग्य तो निर्णय’ घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळते.
निवेदन देतांना पत्रकार विनायक दिवटे, लक्ष्मण सूर्यवंशी, दिलीप जैन, बंडू सोनार, चिंतामण पाटील, नंदकुमार शेलकर, राहुल महाजन, भुवनेश दुसाने, नरसिंग भुरे, प्रविण बोरसे, दिलीप परदेशी, भोला पाटील, जाविद शेख, छोटू सोनवणे, निलेश पाटील यांसह तालुका व शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते. “पवित्र तपोवनावर कुऱ्हाड चालू देणार नाही” असा ठाम निर्धार यावेळी पत्रकारांनी व्यक्त केला.
“सिमेंटच्या जंगलाचे कटकारस्थान?” नागरिकांमध्ये तीव्र शंका.
वारंवार कुंभमेळे याच तपोवनात पार पडले असून लाखो साधू-संत आणि भाविकांनी या वृक्षछायेत विसावले आहे. पण आता अचानक वृक्षतोडीची गरज का भासते? तपोवनातील जागा काही धनदांडग्यांच्या हवाली करून तेथे आलिशान इमारती उभारण्याचा डाव तर नाही ना? अशी गंभीर शंका नागरिक व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहे.
पत्रकार संघाच्या आंदोलनाची दखल घेत अनके पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत.
#SaveTapovan #StopTreeCutting हे हॅशटॅग राज्यभर ट्रेंडमध्ये असून तपोवन रक्षणासाठी मोठा जनसमुदाय एकवटू लागला असून आगामी दिवसांत प्रशासन काय निर्णय घेते या भूमिकेकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे. तसेच पत्रकारांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर आता तगडा दबाव आला आहे. वृक्षतोडीचा निर्णय मागे घेतला जातो की सरकारी यंत्रणा पुढे सरसावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपोवनचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पुढील काही दिवसांत निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपोवनाचे रक्षण हे केवळ झाडांचे नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि पर्यावरणाच्या भविष्याचे रक्षण आहे, असा जोरदार स्वर राज्यभरात उमटत आहे.




