कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमण धारकांना आतातरी बसेल का फटका, कधी होईल अतिक्रमणातून ग्रामस्थांची सुटका.

0
179

मुख्य संपादक: सतिश गोपाळ

(पाचोरा)दि.21/09/2024

पाचोरा तालुक्यातील गावागावात तसेच विशेष करुन मोठ्या लोकसंख्येच्या गावांना मागील पंधरा वर्षांपासून राजकारणाचे ग्रहण लागले असल्याने या गावात विकासकामांसह जनहिताचे निर्णय घेतांना ग्रामपंचायतीचे सरपंच, गावातील सुज्ञ नागरिक व समाज सेवकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. असाच काहीसा प्रकार सद्यस्थितीत कुऱ्हाड खुर्द गावातील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढतांना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे खात्रीलायक वृत्त असून “कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमण धारकांना आतातरी बसेल का फटका, कधी होईल अतिक्रमणातून ग्रामस्थांची सुटका” असा प्रश्न कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कारण कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी मा. न्यायालयातून हिरवा कंदील मिळाला असून या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी व पूर्तता करत ग्रामपंचायतीने मागील पाच दिवसांपूर्वी अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन आपण आपले अतिक्रमण स्वताहून काढून घ्यावे अन्यथा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल असे नोटीसीद्वारे कळविले आहे. मात्र पाच दिवसांचा कालावधी उलटला तरीही आजपर्यंत एकही अतिक्रमण धारकांने अतिक्रमण काढून घेण्यासाठी तसदी घेतली नाही तसेच अतिक्रमण धारक ढुंगणाला पाय लावून पळत सुटले असून या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला कसे थांबवता येईल याकरिता कायदेतज्ज्ञ तसेच भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इच्छूक असलेल्या उमेदवारांकडे जाऊन भाऊ, तात्या, काका, दादांच्या घराभोवती घिरट्या घालून तुम्ही आम्हाला वाचवा आम्ही तुम्हालाच मतदान करु व जास्तीत, जास्त मते मिळवून देऊ असे आश्वासन देऊन अतिक्रमण निर्मूलन मोहिम थांबवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत उभे रहाणारे इच्छुक उमेदवार हे गाव विकासाचा फतवा घेऊन फिरत असल्याने संबंधित इच्छुक उमेदवारांनी अतिक्रमण धारकांना कोणताही थारा दिला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे कारण कुऱ्हाड खुर्द येथील अतिक्रमण हे गावाच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे संबंधित इच्छुक उमेदवारांना माहीत असल्यामुळे अतिक्रमण धारकांना निराश होऊन परतावे लागते आहे. तसेच अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटीस प्रमाणे कार्यकाळ संपला असूनही अतिक्रमण धारकांनी आजपर्यंत अतिक्रमण काढून घेतले नसल्याचे दिसून येते असल्याने आता ग्रामपंचायत काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
******************************************
अतिक्रमण काढणे अत्यंत गरजेचे, सुज्ञ नागरिक व शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीची मागणी.
******************************************
कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसर हा महत्त्वाचा रहदारीचा परिसर असून याच परिसरातून पाचोरा, लोहारा ते जळगाव रस्ता, कुऱ्हाड ते वरखेडी रस्ता, कुऱ्हाड ते अंबे वडगाव रस्ता, कुऱ्हाड ते कळमसरा रस्ता जात असल्याने या बसस्थानक परिसरातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व याच बसस्थानक परिसरात टपऱ्या व पत्र्याचे शेड उभारुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून या अतिक्रमीत दुकानातून सट्टा बेटींग, गावठी, देशी व विदेशी दारुची अवैध विक्री रात्रंदिवस खुलेआम सुरु असल्यामुळे याठिकाणी व्यसनाधीन लोकांची जणू यात्राच भरते तसेच याच परिसरात जीवंत बकऱ्या, कोंबड्यांची भररस्त्यावर हत्या करुन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे मांस उघड्यावर लटकत ठेवून विक्री केली जात असल्याने या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या महिला व लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. तसेच मासाचा उर्वरित टाकाऊ भाग येथेच फेकून दिला जात असल्याने याठिकाणी कुत्र्याची जणू यात्राच भरते यामुळे रहदारीला अडथळा व जाणाऱ्या, येणाऱ्यांना कुत्रा चावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत व याच ठिकाणाहून कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामस्थ, महिलावर्ग, शालेय विद्यार्थ्यी व विद्यार्थीनींना या बसस्थानक परिसरात बस येईपर्यंत थांबावे लागते व यावेळी त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तसेच सायंकाळी शाळेतून घरी येतांना दारुड्यांच्या घोळक्यातून, अडचणीतून व वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन मार्ग काढून यावे लागते यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.