मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा) दि.04/08/2025
पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून हे बोगस डॉक्टर बिनधास्तपणे ॲलोपॉथी औषधांचा वापर करुन रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत अशी माहिती समोर येत असून हा गैरप्रकार रोखण्यासाठी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील चिराग शहा या समजसेवकाने जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित विभागाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तक्ररदार चिराग शहा यांच्या मते पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात काही बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्रासपणे ॲलोपॉथी औषधांचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे यांचे वैद्यकीय शिक्षण झाले नसल्याने यांच्याकडे रोगनिदान करण्याची क्षमता नाही म्हणून ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना गरज नसतांनाही फक्त कमीशन कमावण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवून रक्त, लघवी, थुंकी तपासणी व इतर तपासण्या करण्यासाठी भाग पाडत असल्याचे दिसून येते.
याबाबत सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया खरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. सुज्ञ नागरिकांच्या मते हे बोगस डॉक्टर रुग्ण तपासणी करण्यात अक्षम आहेत परंतु ते फक्त आणि फक्त ऐकीव माहितीवर किंवा चार पुस्तके वाचून बिनधास्तपणे दवाखाना चालवत आहेत. यामुळे आजाराचे योग्य निदान होत नाही व चुकीच्या औषधोपचारामुळे आजार बरा होण्याऐवजी तो वाढत जातो व पुढे रुग्णांना जास्त त्रास झाल्यावर त्यांना तज्ञ डॉक्टरांकडे पाठवण्यात येते परंतु यामुळे कधी, कधी वेळ निघून गेलेली असते व किडनी कॅन्सर, अशा दुर्धर आजारांचा सामना करत आपला जीव गमवावा लागला असल्याचे पाहावयास मिळत आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात व पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात कोणत्याही प्रकारची अधिकृत डिग्री नसतांनाही गल्लोगल्ली जसे भिकुसा किंवा कटलरी विकणारे फेऱ्या मारतात अशा प्रकारे हे बोगस डॉक्टर आपल्या दुचाकीला बॅग टांगून फिरतात व बिनधास्तपणे गरजू रुग्णांनावर उपचार करतांना दिसून येतात यामुळे सर्वसामान्य ज्यांना बोगस डॉक्टर कोण याची जाणीव नसल्यामुळे गरजु रुग्ण यांच्याकडून उपचार करुन घेत असल्याची माहिती गावागावांतील सुज्ञ नागरिकांनी दिली आहे.
बऱ्याच दिवसापासून या बोगस डॉक्टरांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गोरख धंदा सुरू असून, वरखेडी व भोकरी गावात बोगस डॉक्टरांनी राजकीय व स्थानिक नागरिकांचे पाठबळ मिळवून घेत वेगवेगळ्या पदव्या मिळाल्या आहेत असे दाखवण्यासाठी दवाखान्यासमोर वेगवेगळ्या डिग्री असल्याचे फलक लावले आहेत. तसेच दवाखान्याच्या आतील भागात इंग्रजी भाषेतील सर्टिफिकेट टांगून आपण मुन्नाभाई एम. बी. बी. एस. असल्याचे भासवून फसवणूक करत गोरगरीब जनतेची दिशाभूल करून त्यांच्या जीवाशी खेळ करून आपली पोळी भाजून घेत भरगच्च कमाई करून बंगले उभे केले आहेत,
महत्वाचा विषय म्हणजे काही दवाखान्यात ज्यांचे आई, वडील, किंवा भाऊ मान्यताप्राप्त वैद्यकीय शिक्षण घेऊन दवाखाना चालवत आहेत अशा दवाखान्यात अधिकृत डॉक्टर उपस्थित नसतांनाही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसले तरी फक्त आणि फक्त अनुभवाच्या आधारावर त्यांचे भाऊ, पती किंवा अन्य सदस्य बिनधास्तपणे रुग्णांवर उपचार करतांना दिसून येतात अशी माहिती तक्रारदार चिराग शहा यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
म्हणून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार चिराग शहा व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.




