मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा) दिनांक: 19/10/2024
पाचोरा तालुक्यात काल सांयकाळपासून वादळीवाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. याच वादळी वाऱ्यासह पावसात लोहारी गावाजवळ असलेल्या अनिल पाटील यांच्या शेतामध्ये शिवराम सिताराम शिंगाडे, त्यांची पत्नी सौ. मंगलाताई शिवराम शिंगाडे व त्यांचा मुलगा गोरखनाथ राहाणार पिंप्राळा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील (मेंढपाळ) धनगर समाजाचे कुटुंब आपल्या लेकराबाळासह मेंढरं घेऊन मुक्कामाला होते.

सायंकाळ पासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री उग्र रुप धारण केले व वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच वेळी आपल्या मेंढ्यांच्या वाड्याजवळ बनवलेल्या कुपीमध्ये एका बाजूला शिवराम सिताराम शिंगाडे व त्यांची पत्नी तर दुसऱ्या बाजूला यांचा मुलगा गोरखनाथ शिवराम शिंगाडे वय वर्षे (१४) हा पाण्यापासून बचाव करत बसलेला होता.
नेमके याचवेळी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे वीजेच्या कडकडाटासह पावसात मोठा आवाज झाला व वीज थेट गोरखनाथ शिवराम शिंगाडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा व जवळच असलेल्या एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर शिंगाडे कुटुंबीयांनी धावाधाव सुरु करत गोरखनाथवर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला.
हा आवाज ऐकून लोहारी ग्रामस्थांनी भरपावसात घटनास्थळी धाव घेतली व धनगर कुटुंबीयांना धीर दिला तसेच सकाळी मयत गोरखनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेऊन तेथे सोपस्कार पूर्ण करुन लोहारी ग्रामस्थांनी मयत गोरखनाथ याच्यावर अंत्यसंस्कार केले.
शिंगाडे कुटुंबीयांची परिस्थिती पाहून जवळच असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाजवळ धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या धान्यापैकी काही धान्य त्या धनगर कुटुंबातला देऊन मायेचा आधार दिला.




